मुंबई : अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाली असून जलसाठा मर्यादित आहे. या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केले आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून १६ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिली.
२०२६च्या खरीप हंगामातील कळ-१ लागू झालेल्या राज्यातील २८४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासंदर्भात सोमवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. धरणे व जलाशयांमधील पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले देण्यात आले आहे.
बाष्पीभवन, गाळ व अनधिकृत उपसा विचारात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवले जाईल. भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन प्रत्येक धरणात १० टक्के अतिरिक्त (बफर) आपत्कालीन साठा राखीव ठेवला जाईल. गरज भासल्यास तांत्रिक तपासणी करून मृतसाठ्यातील पाण्याचाही वापर केला जाणार आहे. सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करावा. पाणीगळती रोखण्यासाठी मोहीम राबवावी, दीर्घ कोरडा कालावधी वाढवण्यात यावा. सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने चालवून प्रक्रिया केलेले पाणी बागा, बांधकाम व धुलाईसाठी वापरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, घरगुती वापरासाठी पाणी, औद्योगिक वापर आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ व इतर संस्थांच्या चाऱ्याच्या व बी-बियाण्यांच्या कार्यक्रमासाठी लागणारा पाणीसाठा असे प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. याची गरज भागल्यानंतरच पाणी शिल्लक राहत असेल तर कमी पाणी लागणारी रब्बी हंगामी भुसार पिके व जास्त चारा देणारी भुसार पिके यांच्यासाठी पाणी वापरावे. त्यानंतर रब्बी पिकांना आणि पाणी शिल्लक राहिल्यासच बारमाही पिकांच्या पाणी वापराला मंजुरी दिली जाणार आहे.
औद्योगिक क्षेत्राने उपलब्ध एकूण वापरापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात. प्रक्रिया केलेले पाणी वापरणे शक्य असेल तेथे पिण्याच्या पाण्याचा वापर कमी करावा, असे बजावण्यात आले आहे. धरणे, नद्या व कालव्यांमधून अनधिकृत पाणी उपसा तत्काळ रोखण्यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालणार आहेत. दोषींवर कारवाई करून बेकायदेशीर पंप व साहित्य जप्त केले जाणार आहे.
पाणी जपून वापरा
पालकमंत्री आणि कालवा सल्लागार समित्यांच्या माध्यमातून पाण्याचा नियमित आढावा घेतला जाईल. आगामी वर्षातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी आणि सर्व यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे. – गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
