मुंबई : राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रांतातील काही भागात अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. राज्यातील काही भागातील उकाड्यात वाढ होणार असून काही भागांना उष्णतेच्या लाटेचा तर काही भागांना पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागात फेब्रुवारीपासूनच उकाडा जाणवत आहे. तसेच कमाल आणि किमान तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे यंदाचा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवमान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुढील चार दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असून त्यांनतर तापमानात घट होईल, अशा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाहुन अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे.
उष्णतेची लाट कुठे ?
कोकण, विदर्भ , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभाकडून वर्तविण्यात आला आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, अकोला, अमरावती आणि वर्धा आदी जिल्ह्यांमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पावसाचा इशारा कुठे ?
मुंबई, पालघर, ठाणे , धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आदी भागात सोमवारी उष्ण आणि दमट हवामान राहणार असून या भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि घाट भाग, सिंधुदुर्ग आदी भागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईचे हवामान कसे राहील ?
मागील काही दिवस मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.६ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारीही कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून सोमवारी शहरातील कमाल तपमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
