मुंबई : भारतातील विविध भागात विशेषत: उत्तरेच्या राज्यांत पश्चिमी विक्षोभामुळे मेघगर्जना, तीव्र वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची नोंद होत आहे. यामुळे भारतासह महाराष्ट्रातील अनेक भागात अस्थिर हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ७ एप्रिलनंतर पुन्हा एका पश्चिमी विक्षोभाचा परिणाम भारतातील उत्तरेच्या राज्यांवर होण्याची शक्यता आहे. तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशातील काही भागातील उकाडा वाढण्याची
शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्रातील अनेक भागात मार्चमध्ये उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काही भागातील कमाल तापमानात वाढ होऊन पारा ४० अंशाच्या वर गेला होता. यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाळी हवामान कायम आहे.
तसेच राज्यातील विशेषत: कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात घट नोंदली जात आहे. तसेच वाऱ्याचा वेग वाढल्याने तीव्र उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मात्र, दुपारच्या वेळेस उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. पुणे, कोल्हापूर भागात जोरदार पाऊस आणि गरपीटीची नोंद झाली. पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
उकडा कुठे वाढणार ?
हवामान अभ्यासकांच्या अनुमानानुसार, १५ एप्रिलनंतर कमाल तापमानात वाढ होण्याची आणि भारतातील उत्तरेच्या राज्यांत याचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. यादरम्यान, कमाल तापमान ४० अंशावर जाईल. यामुळे उकड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील स्थिती कशी असेल ?
राज्यात सध्या पावसाळी हवामान असल्याने कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. राज्यातील अंतर्गत भागात कमाल तापमानात पुढील दोन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होईल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
एप्रिलमध्ये राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमान सामान्य ते सरासरीपेक्षा कमी राहील, तर राज्यातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यताही हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
