मुंबई : मागील आठवड्यात राज्यातील कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची नोंद झाली तर राज्यातील इतर भागातही काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात गुरुवारपासून पुढील काही दिवसांसाठी पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गुरुवारी घाट विभागातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
यात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागातील काही भागांचा समावेश आहे. उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने येथील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. वसई विरारसह काही भागातील जनजीवन गुरुवारीही पूर्ववत झाले नसून येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या प्रदेशातील पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पुढील काही दिवस कोकण किनारपट्टी आणि घाट विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झालाअसली तरीही अजूनही निम्मा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाहून कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस विदर्भातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच १६ आणि १७ जुलै रोज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात तर २० ते २२ जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे ?
पुणे घाट विभाग आणि सातारा घाट विभागात आज हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे तर कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांमध्ये वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.
