मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. सध्या मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव दिसून येत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही भागात पावसाची नोंद होत असून काही भागात शुक्रवारीही पावसाची नोंद झाली, तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांवर शनिवारी वादळी पावसाचा प्रभाव राहील, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही भागात पावसाची नोंद होत असली तरीही हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होण्याचा अंदाज असून त्याचा प्रभावही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचा शक्यता असली तरीही त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील, तसेच विदर्भातील काही भागात गुरुवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील बहुतांश भागात शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. तसेच या प्रदेशात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, मागील काही दिवसांच्या तुलनेत उत्तर कोकणातील बहुतांश भागात कमाल तापमानात काहीशी वाढ नोंदली जात आहे.
वादळी पावसाचा प्रभाव शनिवारी कायम राहण्याचा अंदाज असून राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यादरम्यान काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?
सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदिया आदी भागांमध्ये शनिवारी वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे तसेच सांगली, कोल्हापूर, ठाणे, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, धुळे आणि जळगाव आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
