मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. यामुळे काही ठिकाणी पावसाचा तर काही ठिकाणी उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राज्यात पावसाळी हवामान कायम असून सोमवारी पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसासह गारपीटीचीही नोंद झाली. राज्यात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

पश्चिमी विक्षोभामुळे सध्या उत्तर भारताच्या अनेक भागात पावसाची नोंद होत असून अनेक भागांना पावासाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या काही नैसर्गिक कारणांमुळे राज्यात मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस, विशेषत: राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे राज्यातील पुढील काही दिवस हे पावसाळी हवामानाचे असतील.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक असेल. त्यामुळे तेथीस बहुतांश जिल्ह्यांना मंगळवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून कोकण प्रांतातील मुंबई आणि पालघर भाग वगळून उर्वरित भागांना तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी पावसाची तीव्रता अधिक असेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यात पावसाळी हवामान असले तरीही विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उकाडा कायम आहे. या प्रदेशातील कमाल तापमानात सोमवारी फारसा बदल झालेला नाही. कोकण प्रांतातील अनेक भागात कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात आहे. सोमवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद वर्धा येथे झाली. तेथील कमाल तापमान ४१.६ अंश सेल्सिअस इतके होते.

मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे?

जळगाव, नाशिक, नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आदी भागांना मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून यावेळी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

‘यलो अलर्ट’ कुठे?

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे घाट विभाग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट विभाग, सातारा घाट विभाग, नांदेड, लातूर, धाराशिव,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.