मुंबई : कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाची नोंद होत असून पुढील तीन दिवस या प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर कोकणात पावसाची तीव्रता अधिक आहे. अनेक भागात अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रदेशातील काही भागात जुलैमधील सरासरीच्या ५० ते ९० टक्के पावसाची नोंद मागील चार दिवसात झाली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस कोकणप्रदेशासह घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

संपूर्ण राज्यात जून महिन्यात दिलासादायक पावसाची नोंद झाली नाही, जुलै महिन्याच्या सुरवातीलाच मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने काही भागात पावसाचा जोर अधिक आहे. मोसमी वारे सक्रिय झाले असून तसेच २ जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता त्याची तीव्रता वाढताना दिसत असून ते डिप्रेशनमध्ये रूपांतरित होत आहे. ही हवामान प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्राहून अधिक तीव्र हवामान प्रणाली असते. या स्थितीत वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितीही अधिक होते. तसेच ऑफ शोअर ट्रफ म्हणजे कमी दाबाच्या एका लांब पट्ट्याची निर्मिती होते तेव्हा अनेकदा उंच ढग तयार होऊन अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता असते.

सध्या हा पट्टा महराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीवर सक्रिय असून तो पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक भागात मोसमी पावसाचा जोर असून काही भागात अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद होत आहे, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. साधारणपणे तीन दिवसांनंतर म्हणजेच ७ तर ८ तारखेनंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील चार दिवसात मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग वगळून मराठवाड्यातही दिलासादायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याचबरोबर विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक आहे तर काही भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात गोंदिया येथे सर्वाधिक पावसाची नोंद मागील चार दिवसात झाली आहे. तेथे २७३.३ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच यवतमाळ ९७ मिमी, वर्धा ८१ मिमी, चंद्रपूर ८९ मिमी, नागपूर ७६. ५ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील बहुतांश तसेच विदर्भातील काही भागात आतापर्यंतच्या हंगामातील सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. यात नंदुरबार येथे सर्वाधिक कमी म्हणजे सरासरीच्या पावसाहून ८४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशातील शेतकरी चिंतेत आहेत.

कोकण प्रदेशातील पाऊस

(१ ते ५ जुलै सकाळी ८:३० पर्यत )

  • सिंधुदुर्ग – ३२८ मिमी
  • रत्नागिरी – ४७२ मिमी
  • रायगड – ६६९ मिमी
  • मुंबई उपनगर – ७४० मिमी
  • मुंबई शहर – ६९५ मिमी
  • ठाणे – ४८२.४ मिमी
  • पालघर – ४८१ मिमी

मध्य महाराष्ट्र

  • नाशिक – १०६ मिमी
  • जळगाव – ५०. ८ मिमी
  • पुणे – १२७ मिमी
  • सातारा – १४० मिमी
  • सांगली – ४९ मिमी
  • कोल्हापूर – २२० मिमी

आज अलर्ट कुठे ?

दरम्यान, सोमवारीही रायगड, पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग, नाशिक घाट विभाग आदी भागात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक आदी जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच संपूर्ण विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.