मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची नोंद होत असून विदर्भातील काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने मे महिन्यातील हवामानाचे अंदाज प्रसिद्ध केले असून मेच्या पहिल्या आठवड्यात काहीसे दिलासादायक हवामान असले तरीही दुसऱ्या आठवड्यापासून काही भागातील तापमानात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच या दरम्यान किमान तापमानातही वाढ होणार असून यामुळे रात्रीच्या वेळीही उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाकडून मे महिन्यातील चार आठवड्यांचे अंदाज प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील विदर्भ आणि कोकण प्रदेशासह काही भागातील कमाल तापमान हे सरासरी तापमानापेक्षा अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच या दरम्यान काही भागातील किमान तापमानातही वाढ होईल, यामुळे रात्रीच्या वेळी उकाडा जाणवेल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातही उकाड्यात वाढ होण्याची शक्यता असून विदर्भ आणि आसपासच्या परिसरात उन्हाचा तडाखा जाणवेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे मे महिन्यात उन्हाची काहिली अधिकच वाढणार आहे. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याचे अंदाज खासगी हवामान संस्थांकडून व्यक्त केले जात असून मान्सून वेळेत दाखल झाल्यास नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यंदाच्या पावसावर ‘एल निनो’चे सावट असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे मोसमी पावसाच्या काळातही उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता खासगी हवामान संस्था असलेल्या ‘स्कायमेट’ ने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
पावसाची शक्यता किती ?
हवामान विभागाने मे महिन्यासाठी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात तसेच देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात मे महिन्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मे महिन्याचे अंदाज प्रसिद्ध करण्यात आले असले तरीही हवामानाच्या स्थितीत काही बदल झाल्यास त्यानुसार हवामान विभागाकडून इशारा दिला जातो.
