मुंबई : राज्यात उकाडा असह्य झाला असताच आता हळूहळू मान्सून पूर्व घडामोडींना वेग येताना दिसत आहे. मागील काही दिवस राज्यतील काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती होती. मात्र, हवामानात बदल होत असून आता हळूहळू या प्रदेशांवर वादळी पावसाचा प्रभाव वाढत आहे. यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात घट होत असून नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, शनिवारपासून राज्यात वादळी पावसाचा प्रभाव वाढणार असून हवामान विभागाकडून काही भागांना ‘ऑरेंज’ तर काही भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मान्सूनची वाटचाल कुठेपर्यंत ?
सध्या केरळ येथे जोरदार पावसाची नोंद होत असल तरीही अजून मान्सून दाखल झालेला नाही. सध्या मान्सूनची वाटचाल नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लक्षद्वीप परिसराच्या उर्वरित भागात सुरु आहे. १६ मे रोजी अंदमान येथे मान्सून दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर हवामानाच्या स्थितीमुळे मान्सूनची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरु आहे. आतापर्यतच्या नोंदीनुसार केरळ येथे साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात वादळी पाऊस
राज्यात वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत असून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण. मराठवाडा येथे मागील काही दिवसांपासून काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत होती. दरम्यान, शुक्रवारपासून विदर्भ प्रदेशावरही वादळी पावसाचा प्रभाव असून शनिवारी या प्रदेशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला असून शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शनिवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे ?
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांना शनिवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यादरम्यान ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे. तर अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक आणि नाशिक घाट विभाग आणि नंदुरबार आदी भागांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
