मुंबई : राज्यात सध्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागांना एकीकडे दिलासा मिळताना दिसत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक भागात दिलासादायक पावसाची नोंद होत असून त्यामुळे काही भागात शेतीच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील चोवीस तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, पुणे घाट विभागात २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.. मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत तसेच २ जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता त्याची तीव्रता वाढताना दिसत असून ते डिप्रेशनमध्ये रूपांतरित होत आहे. ही हवामान प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्राहून अधिक तीव्र हवामान प्रणाली असते. या स्थितीत वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितीही अधिक होते. त्यामुळे मान्सूनची स्थिती सध्या चांगली आहे, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

पावसाचा जोर कधीपर्यंत?

मान्सूनला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सध्या सक्रिय असल्याने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता अधिक असण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी आणि घाट विभागात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. घाट विभागात पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील घाट माथ्यांचा समावेश आहे. साधारणपणे तीन दिवसांनंतर म्हणजेच ७ तर ८ तारखेनंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहेत.

आज ‘रेड अलर्ट’ कुठे?

कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, पुणे घाट विभाग, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर आदी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रविवारी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग, नाशिक घाट विभाग, भंडारा आणि गोंदिया आदी भागात ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे .

आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?

पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, हिंगोली, वाशिम अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून रविवारी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.