मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही भागात हलक्या सरींची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात हवामान कोरडे आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी असून काही भागात कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होईल, असे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, बुधवारी राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील तर काही भागात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असली तरीही राज्यातील बहुतांश भागात साधनकारक पावसाची नोंद झाली नाही. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात उन्हाच्या झळा वाढत असून मागील चोवीस तासात राज्यातील अनेक भागात पावसाची नोंद झाली नाही. दरम्यान, शनिवार पर्यंत राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान स्थितीत बदल कधी ?

राज्यात सध्या हवेच्या वरच्या भागात कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव असल्याने मोसमी वारे कमकुवत झाले आहेत. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही कमी असल्याने पावसाची दडी आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर वाढण्यास काही हवामान प्रणाली सक्रिय होणे गरजेचे असते. यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्यासह कोकण किनार पट्टीवर ‘ऑफ शोअर टर्फ’ म्हणेजच कमी दाबाचा लांब पट्टा तयार होणे गरजेचे असते. सध्या राज्यात अशा प्रकारची कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात ढगाळ हवामान असले तरीही पावसाचे प्रमाण कमी राहील, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, १९ ते २० जुलै नंतर राज्याच्या हवामानात बदल होण्याचा अंदाज असून त्यामुळे कोकण प्रदेशासह काही भागात पावसाची शक्यता असली तरीही राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता कमीच राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज यलो अलर्ट कुठे ?

रायगड, ठाणे, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक घाट विभाग आदी भागांना बुधवारी हवामान विभागाकडून वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून मुंबई, पालघर, सातारा घाट विभाग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड आदि भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.