मुंबई : गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उकडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही चढ – उतार होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.
मुंबईत गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात झाली. येथील कमाल तापमान ३५.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. यामुळे राज्यातील सार्वधिक कमाल तापमान मुंबई येथे नोंदले गेले.
मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. दरम्यान, अनेक भागातील कमाल तापमानात गुरुवारी वाढ झाली आहे. मुंबईतही बुधवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती तर गुरुवारीही येथील तापमान ३५.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
कुलाबा केंद्रात ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना वाढत्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. कोकण पट्ट्यातील सर्वच प्रदेशांमधील कमाल तापमान हे सामान्यपेक्षा अधिक नोंदले गेले. येत्या आठवड्याभरात मुंबईसह कोकणातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची चिन्ह आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या आठवड्यात मुंबईसह कोकणात कमाल तापमानात वाढ होणार असून यादरम्यान तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. कोकणातील काही भागांमध्ये यापेक्षाही अधिक कमाल तापमान राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
तर राज्याच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठा बदल झालेला नाही. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली. येथील किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या काही दिवसात राज्यातील अंतर्गत भागात किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस इतके राहील, तर कोकण पट्ट्यातील काही भागात किमान तापमान अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाले असून दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यमुळे मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. तसेच पुढील दोन दिवसात राज्यातील काही भागात किमान तापमानात घट होईल आणि त्यांनतर वाढ होईल. – एस.डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग पुणे</strong>.

