मुंबई : राज्यात आतपर्यंत ऑगस्ट महिन्यात दिलासादायक पावसाची नोंद झाली नाही. मागील काही दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत असली तरीही एकंदरीतच पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अनेक भागात असणारी पावसाची तूट आणखीन वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा हवामान बदलाचे चटके प्रकर्षाने जाणवत आहेत. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा वाढता प्रभाव उर्वरित मान्सूनच्या हंगमावर राहील, अशी शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केली आहे. देशात आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात ७० टक्केहून अधिक भागात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे, तर आटपर्यतच्या मान्सूनच्या हंगामात नोंद झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार देशात १३.७ टक्के पावसाची तूट आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. यात विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मोठी तूट आहे.

दरम्यान, शनिवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव सध्या ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय , छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आदी भागांवर आहे. दरम्यान, राज्यात आज विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, १० सप्टेंबरनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होईल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ?

हवामान विभागाकडून पुढील चार आठवड्यांसाठी हवामानाचा अंदाज प्रसिद्ध करण्यात आला असून यात ३ ते १० सप्टेंबरच्या दरम्यान राज्यातील प्रामुख्याने कोकण प्रदेशातील जिल्हे मध्य महाराष्ट्रातील काही भागात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या दरम्यान बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीहून कमी पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यास दुष्काळाचे सावट असणाऱ्या प्रदेशांना काहीसा दिलासा मिळेल असा, अंदाज आहे.