मुंबई : राज्यात पावसाळी हवामान कायम असून राज्यातील काही भागांत गारपीट आणि पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारीही राज्यातील अनेक भागांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळी हवामान कायम असले तरीही पुढील दोन दिवसात राज्यातील अंर्तगत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानातील वाढ आणि आद्रता यांमुळे राज्यातील उकाडा वाढण्याची चिन्ह आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट यांसह पावसाची नोंद होत असून त्यामप शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात तसेच पुण्यात बुधवारी वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद झाली. गुरुवारीही राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण पट्ट्यातील काही भाग, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाळी हवामान कायम राहणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील अंतर्गत भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.
ऑरेंज अलर्ट कुठे ?
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड आदी भागांना हवामान विभागाकडून गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
येलो अलर्ट कुठे ?
ठाणे ,रायगड,रत्नागिरी, पुणे घाट विभाग, सातारा, सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ आदी भागांना हवामान विभागाकडून गुरुवारी ”येलो अलर्ट” देण्यात आला आहे.
मुंबईत सकाळी काही काळ शहरात आणि उपनगरात ढगाळ हवामान आणि गार वारे जाणवतात. दुपारच्या वेळी मात्र नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. आर्द्रतेमुळेही उकाडा अधिक जाणवतो. सध्या शहरात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३१.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी कुलाबा केंद्रात २५.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २५.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. दरम्यान, गुरुवारी शहरातील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस इतके राहील, अशा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
