मुंबई : नुकताच पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे भारताच्या विशेषतः उत्तरेच्या राज्यांत, तसेच महाराष्ट्रातही पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट आणि वादळी वाऱ्याची नोंद झाली. सिक्कीम येथे बर्फवृष्टीमुळे भूस्खलन होऊन आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होत असताना आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हवामानात बदल होऊन पुन्हा नव्या पश्चिमी विक्षोभामुळे वादळाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतातील काही राज्यांसह महाराष्ट्रातही वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर सातत्याने हवामानात होणारे बदल उष्ण आणि थंड अशा वातावरणामुळे नागरिकांच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. पुढील काही महिने हवामानातील अस्थिरता सुरूच राहणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मे महिन्यात पुन्हा तीव्र पश्चिमी विक्षोभाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
वादळी हवामान कधी ?
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पश्चिमी विक्षोभाची स्थिती उत्तर भारतात निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. यात मुख्यतः जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.यात ११ ते १२ एप्रिल, १५ ते १७ एप्रिल आणि २४ ते २७ एप्रिल यादरम्यान वादळी हवामान राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
वादळाची तीव्रता किती ?
हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, यादरम्यान निर्माण होणाऱ्या वादळाचा प्रभाव हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे. यामुळे देशातील काही भाग वगळता उत्तरेच्या राज्यांवरही याचा फारसा परिणाम होणार नाही, अशीही शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात उकाडा वाढणार ?
सध्या राज्यात कोरडे हवामान असून काही भागातील उकाड्यात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर कोकणातील काही भागात उकाडा वाढणार असून मुंबईसह अनेक भागातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तसेच विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णता वाढीचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
