scorecardresearch

राज्यात कडाक्याची थंडी; दाट धुक्याचा प्रभाव कायम; मुंबईतील किमान तापमानात घट

राज्यातील किमान तापमानात हळूहळू घट होऊन थंडी आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात कडाक्याची थंडी; दाट धुक्याचा प्रभाव कायम; मुंबईतील किमान तापमानात घट
संक्रांतीपर्यंत थंडी आणखी वाढणार (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यभरात किमान तापमानात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने वातावरणात गारठा वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात थंडीची लाट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील पारा चढता होता. आता किमान तापमानात घट झाल्याने काही प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे.

मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील किमान तापमानात हळूहळू घट होऊन थंडी आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, मुंबई आणि कोकणातील किमान तापमान सरासरीएवढेच राहून वातावरणात गारठा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संलग्न मराठवाडा, तसेच बहुतांश विदर्भात किमान तापमानात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. किमान तापमान ८ ते १२ अंशाच्या आसपास पोहचले आहे. विदर्भ आणि खानदेशातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशाने कमी झाले आहे. त्यामुळे विदर्भासह नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जळगावसह लगतच्या जिल्हयांत पारा खाली उतरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.  १० जानेवारीपासून ते १५ जानेवारीपर्यंत किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने हळूहळू घसरण होईल. मुंबईसह कोकण विभागातील किमान तापमान सरासरीइतके राहून काही प्रमाणातच थंडी जाणवेल.

दरम्यान, सोमवारी सकाळी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने किमान २२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्राने किमान १९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले.

मध्य प्रदेशापर्यंत संपूर्ण उत्तर भारतात उच्च टक्केवारीतील आद्र्रता व मंद वाऱ्यामुळे दाट धुक्याचा प्रभाव कायम असून सकाळच्यावेळी काही ठिकाणी दृश्यमानता कमी होणार आहे. साधारण ५० मीटर अंतरावरील दिसणे कठीण होण्याची शक्यता जाणवत आहे. आद्र्रतेचा प्रभाव कमी होऊन ढगाळसदृश वातावरण निवळून थंडी वाढण्याची शक्यता आहे.

– माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 02:29 IST

संबंधित बातम्या