मुंबई : राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी झाला आहे. मागील काही दिवसांपासून वादळी पावसाचा प्रभाव असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत होती. मात्र, राज्यावर आजपासून असणारा वादळी पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या उत्तरेकडून येणाऱ्या हवामान स्थितीचा प्रभाव असून त्यामुळे पावसाला काहीसा अडथळा निर्माण झाला आहे, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, राज्यात काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाचा जोर वाढण्यास आणि सर्वदूर पाऊस पडण्यास हवामान प्रणालीची सक्रियता फार महत्त्वाची असते. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात जुलै महिन्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची नोंद होऊन जून महिन्यापासून काही भागात असणारी पावसाची तूट कमी झाली. दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर ओसरला आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीही तीव्र होत असून पुढील काही महिन्यात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता जगभरातील विविध हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे पुन्हा सर्वदूर पाऊस कधी पडेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या हवेचा अडथळा

उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या हवेचा प्रभाव सध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा ,तसेच जम्मू आणि काश्मीर आदी राज्यांतील काही भागांवर आहे. तसेच हे कोरडे वारे आता अरबी समुद्रावरही प्रभाव टाकत आहेत. कोरड्या वाऱ्यांमुळे वातावरणाच्या मधल्या स्तरात असणारी आर्द्रता कमी होते. त्यामुळे उंच ढगांच्या निर्मितीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या कारणामुळे इतर राज्यांसह महाराष्ट्रातही सध्या मुसळधार पावसाला अडथळा निर्माण झाल्याची शक्यता आहे, असे काही हवामान अभ्यासकांचे मत आहे.

मुसळधार पावसाची शक्यता कधी ?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र किंवा तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते राजस्थानपर्यंत सरकू लागल्यास अरबी समुदातून अधिक प्रमाणात आर्द्रता या क्षेत्राच्या आजूबाजूच्या प्रदेशात खेचली जाईल. त्यामुळे काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. परंतु, कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र कोणत्या प्रदेशात असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.