मुंबई : ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिमालयाच्या लगतचे काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात कमाल तापमान सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक फटका गुजरात आणि राजस्थान या राज्यांना बसण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही भागांसह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशांना उष्णतेचा तडाखा सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा देशातील बहुतांश भागात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली. तसेच मान्सूनने लवकरच माघार घेतल्याने अनेक भागात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळा ऋतू केव्हा सुरु होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात चढ-उतार होत असला तरीही पुढील काही दिवसात किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून नोव्हेंबर महिन्यासाठी हवामानाचे अंदाज शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले असून यात देशाच्या बहुतांश प्रदेशात सरासरीहून अधिक कमाल तापमान राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात ‘एल निनो’ तीव्र

हवामान विभागाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात अत्यंत तीव्र ‘एल निनो’स्थिती निर्माण झाली आहे. ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टम’ आणि जगभरातील विविध हवामान संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात काही ठिकाणी दिलासा ?

नोव्हेंबर महिन्यामध्ये देशातील बहुतांश भागांत किमान तापमान (रात्रीचे तापमान) सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, मध्य भारत आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सरासरीइतके किंवा त्याहून कमी राहण्याचा अंदाज आहे. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड , महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार आदी राज्यांमधील काही भागांचा समावेश आहे.

राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून दिवसाचे तापमान अधिक असले तरीही रात्री किंवा पहाटेच्या वेळी काही भागात गारवा जाणवतो. तसेच साधारणपणे नोव्हेंबरच्या पंधरवड्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे किमान तापमानात काहीशी घट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हा कालावधी राज्यात थंडी सुरु होण्याचा सरासरी कालावधी मानला जातो.