मुंबई : यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव जागतिक हवामानावर असून अनेक देशांना सध्या तीव्र हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबरपासून ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता वाढण्याचा अंदाज जगभरातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये वाढत्या उष्णेतचा सामना करावा लागणार आहेच. मात्र, एल निनोचा प्रभाव २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज असून त्यामुळे यंदाचा हिवाळाही अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होता. महाराष्ट्राचा विचार करता यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात दीर्घकाळ उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम होती. विदर्भ आणि मराठवाड्यात याचा सर्वाधिक त्रास होता. तर कोकण प्रदेशातील काही जिह्यातील नागरिकांनाही यावर्षी उष्णेतचा दाह अधिक सहन करावा लागला. यंदा मान्सुनही जूनच्या अखेरीस दाखल झाल्याने जूनच्या पंधरवड्यातही उन्हाचा त्रास सहन करावा लागला होता. नुकताच देशातील मान्सूनचा हंगाम संपल्याची घोषणा हवामान विभगाकडून करण्यात आली. गेल्यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस झाला होता. यंदा मात्र देशात १३ टक्के इतकी पावसाची तूट असून राज्यात हेच प्रमाण १९ टक्के इतके आहे. दरम्यान, २००१ च्या पावसाच्या आकडेवारीनुसार, यंदाचा पाऊस हा चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमी पाऊस आहे. पावसाची तूट असल्याने येत्या काही दिवसात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.
हिवाळ्यातही उष्णतेचा सामना ?
‘एल निनो’ ची तीव्रता हळूहळू वाढत आहे. ऑक्टोबरपासून या स्थितीचा प्रभाव अधिक जाणवेल तसेच डिसेंबरमध्ये त्याची तीव्रता अधिक असेल, असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत. दरम्यान, त्यामुळे संपूर्ण हिवळ्याच्या ऋतू दरम्यान या स्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून थंडीच्या दिवसात आणि २०२७ च्या सुरुवातीपर्यंत दरवर्षीच्या तुलनेत अधिक उकाडा जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिवाळ्यातील तापमान हे विविध वातावरणीय आणि स्थानिक घटकांवर अवलंबून असते. दरम्यान, येणाऱ्या काही दिवसात हवामान विभागाकडून याबाबत अधिक माहिती दिली जाईल त्यानंतरच हिवाळ्याचे हवामान कसे असेल याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात सध्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, वादळी पावसाचा प्रभाव ओसरल्याने कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे.
