मुंबई : राज्यात एप्रिल महिन्यात विदर्भात अनेक दिवस उष्णतेची लाटसदृश्य स्थिती कायम होती. या दरम्यान तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशांवर पोहोचला होता. मागील काही दिवसांपासून राज्यात बहुतांश भागात पश्चिमी विक्षोभाच्या (वादळाच्या) स्थितीमुळे पावसाची नोंद होत होती. यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पुढील चार दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नागरीकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

गुजरात आणि राजस्थान येथील काही भागांत उष्णतेची लाटसदृश्य स्थितीची नोंद होत आहे. तसेच राजस्थान येथे काही ठिकाणी धुळीची वादळेही निदर्शनास येत आहेत. तर राज्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागातील कमाल तापमानात वाढ नोंदली जात आहे. दरम्यान, रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला. यामुळे राज्यात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. तसेच राज्यात पश्चिमी विक्षोभाचा (वादळाचा ) प्रभाव कमी होत आहे. पुढील काही दिवस राज्यातील काही भागात कोरडे हवामान तर काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकण प्रदेशातील बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण आहे तसेच दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची नोंद होत आहे. तर उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई येथे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अंतर्गत भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती

दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून रविवारी जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाच नोंद झाली. येथे ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. जे सरासरी कमाल तापमानाहून १.८ अशांनी अधिक होते. दरम्यान, येथे शनिवारच्या तुलनेत कमाल तापमानात २ अंशांनी वाढ नोंदली गेली. तर येथे रविवारी २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट विभाग येथे सोमवारीही उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मंगळवारी उष्णतेची लाट कुठे?

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना आदी भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून या भागांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट ‘ देण्यात आला आहे.