मुंबई : राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सर्वदूर पावसाचा अभाव असल्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी वादळी पावसाच्या प्रभावामुळे काही भागांत पावसाची नोंद झाली असली तरीही एकूण पर्जन्यमान कमी राहिले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
यंदा हवामान बदलाचे परिणाम तीव्र होत आहेत. भारतातही यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. देशातील अनेक भागांत सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण असमान असून त्यामुळे सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे मध्य भारतातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस नोंदला गेला. या दरम्यान महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जूनमध्ये निर्माण झालेली पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यात पावसाने ओढ दिली. या दरम्यान बंगालच्या उपसागरात हवामान प्रणालींचा प्रभाव उत्तरेच्या व पूर्वेकडील राज्यांवर अधिक असल्याने महाराष्टात केवळ काही भागातच वादळी पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वायव्य दिशेला पुढे सरकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवसांत राज्यातील विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच या दरम्यान राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
‘ऑरेंज अलर्ट’ कुठे ?
विदर्भात बुधवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाची तीव्रता वाढून गडचिरोली व गोंदिया आदी भागांना हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून उर्वरीत विदर्भासह नांदेड जिल्ह्याना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच शुक्रवारी विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, १ ते ६ सप्टेंबर दरम्यान कोकण प्रदेशातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या तुलनेने पावसाचा जोर वाढल्यास अनेक भागांना काहीसा दिलासा मिळेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
