मुंबई : राज्यात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये मान्सूनला बळ देणाऱ्या हवामान प्रणालींच्या सक्रियतेमुळे बहुतांश भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वेगाने पश्चिमेकडे सरकत असून या क्षेत्राचे केंद्र मध्य विदर्भ आणि दक्षिण मध्य प्रदेशालगत आहे. या स्थितीमुळे निम्म्या महाराष्ट्रावर ढगांची दाटी झाल्याचे उपग्रहाने शुक्रवारी घेतलेल्या छायाचित्रांवरून निदर्शनास आले. बहुतांश जिल्ह्यात आज वादळी पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जूनच्या तुलनेत जुलैच्या सुरुवातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद झाली. तसेच मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर वादळी पावसाचा प्रभाव असून दुष्काळाचे सावट असणाऱ्या प्रदेशातही जूनच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद होत आहे. दोन दिवसांपूर्वी या क्षेत्राचे रूपांतर अतितीव्र (डीप डिप्रेशन) मध्ये झाले होते. सध्या त्याचे केंद्र विदर्भ आणि मध्य प्रदेशलगत असून ते तीव्र स्थितीत आहे. हे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकत आहे.

अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वारे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले की त्याच्या दिशेने आर्द्रतायुक्त वाऱ्यांचे प्रमाण वाढते. मान्सूनची स्थिती अनुकूल असल्यास अरबी समुद्रातील आर्द्रतायुक्त वाऱ्यांचे प्रमाणही वाढते आणि कमी दाबाच्या क्षेत्रालगत उंच ढंगाची निर्मिती होऊन काही तासातच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होते. जसे हे क्षेत्र पश्चिमेकडे किंवा वायव्य दिशेला पोहोचते तसे त्याच्या लगतच्या क्षेत्रात पावसाची शक्यता वाढते. दरम्यान, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि काही जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसेच संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त आहे.

आज ‘अलर्ट’ कुठे ?

सातारा घाट विभाग, पुणे घाट विभाग, नाशिक आणि घाट विभागामध्ये तसेच धुळे आणि जळगाव येथे आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबार आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई. रत्नागिरी. सिंधुदुर्ग. कोल्हापूर घाट विभाग, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागात हवामान विभागाने वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.