मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात कमाल तापमानात चढ उत्तर होत आहे. तर काही जिल्यात वादळी पावसाने काहीसा दिलासा मिळत असला तरीही राज्यातील उर्वरित प्रदेशात उकाडा कायम आहे. यामुळे नागरिकांचे लक्ष सध्या मान्सूनच्या वाटचालीकडे लागले आहे. दरम्यान, उत्तरेच्या काही राज्यांमध्ये सध्या पश्चिमी विक्षोभामुळे (वादळामुळे) वादळी पावसाची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असून पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात यंदा मे महिना अधिक तापदायक ठरत आहे. विदर्भात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णेतची लाटेसदृश्य स्थिती नोंदली जात होती. त्यामुळे तापमानाचा पारा ४४ ते ४६ अशांवर पोहोचला होता. दरम्यान, शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश प्रदेशात वादळी पावसाची स्थिती असणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होऊन नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसासह गारपीटीचीही नोंद होत आहे. यामुळे येथील कमाल तापमानही मागील काही दिवसांच्या तुलनेत घट झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी या प्रदेशात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून कोकण प्रदेशात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. कमाल तापमान स्थिर असले तरीही उकाडा लक्षणीय वाढला आहे.दरम्यान, राज्यातील कमाल तापमानात पुढील दोन दिवसात २ ते ३ अंशांनी घट होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वादळी पावसाचा प्रभाव कुठे वाढणार ?
शुक्रवारी मुख्यतः विदर्भातील काही भागात वादळी पावसाचा प्रभाव असेल तर उर्वरित राज्यातील तुरळक भागात हलक्या सरींची शक्यात आहे. तर शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण प्रदेशातील काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे तर विदर्भाला पावसाचा ‘यलो अलर्ट’
देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी पावसाचा प्रभाव वाढून मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यातील काही तर संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?
बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून शुक्रवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड आदी भागात हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर उर्वरित राज्यात कोरडे हवामान असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
