मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभामुळे (वादळामुळे ) पावसाळी हवामान असून मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, शनिवारीही राज्यात पावसाचा प्रभाव असणार आहे. यामुळे हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, तर काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
राज्यात एप्रिल महिन्यात विदर्भासह, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद होत होती तर विदर्भात अनेक दिवस उष्णतेची लाटसदृश्य स्थिती कायम होती. सध्या राज्यात पुन्हा वादळामुळे पावसाची तर काही भागात गारपीटीची नोंद होत आहे. यामुळे काही ठिकाणी कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात आहे. यामुळे सध्या नागरिकांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, रविवारपर्यंत राज्यात वादळी पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारीही राज्यातील पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाची आणि वादळी वाऱ्यांची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे अशा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण प्रदेशातील नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची नोंद होत आहे, तर उर्वरित कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरण आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा अधिक सहन करावा लागत आहे. रविवारपर्यत कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सध्या दक्षिण कोकणात सरासरी कमाल तापमानाहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे?
कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडार आणि गोंदिया आदी भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
आज ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे ?
विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून शनिवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
