मुंबई – देवनार कचराभूमीवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाला अखेर महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) मंजूरी दिली आहे. अटी शर्तींवर ही मंजूरी देण्यात आली असून आता उच्च न्यायालयाची आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्याकरीता १८५ लाख टन जुना कचरा हटवण्यात येणार आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय २०२५ मध्ये झाला आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे.
या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर टाकण्यात आली असून मे २०२५ मध्ये या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. नवयुग इंजिनिअरिंग कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. या कामसाठी महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजूरीसाठी मुंबई महापालिकेने अर्ज केला होता. त्याला नुकत्याच झालेल्या बैठकीत अटीसह मंजूरी देण्यात आली आहे.
देवनार कचराभूमीच्या पूर्वेकडे ठाणे खाडी व फ्लेमिंगो अभयारण्य आहे. तसेच परिसरात झोपडपट्टी, औद्योगिक भाग, जलस्रोत, कांदळवन व शहरी क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमसीझेडएमए प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता होती. हा प्रकल्प पर्यावरण सुधारणेसाठी असल्यामुळे प्राधिकरणाने परवानगी दिली असून विविध अटी घातल्या आहेत.
या आहेत अटी …
- सीआरझेड क्षेत्रात कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही. केवळ जुना कचरा काढण्यास परवानगी आहे.
- कांदळवन कापण्यास सक्त मनाई आहे. प्रकल्प स्थळाचा भाग कांदळवन बफर झोनमध्ये येत असल्याने उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
- खाडी किंवा सीआरझेड क्षेत्रात कोणताही घनकचरा टाकू नये.
- कामगारांच्या चौकी, कार्यालये, यंत्रसामुग्री, यांसारख्या सुविधा फक्त बिगर सीआरझेड क्षेत्रातच असाव्यात.
- प्रकल्पा दरम्यान धुळीचे उत्सर्जन रोखण्यासाठी पाण्याचा सतत शिडकावा करावा आणि हवेच्या गुणवत्तेचे वेळोवेळी निरीक्षण करावे.
- नैसर्गिक ओढे, खाड्या आणि जलस्रोत यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये.
- दुर्गंधी कमी करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा.
- कामगारांना योग्य वैयक्तिक संरक्षक उपकरणे पुरवणे बंधनकारक आहे.
१८५ लाख मेट्रीक टन कचरा …
देवनार कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवावा लागणार आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत.
