मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाळी हवामान कायम आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचीही नोंद होत आहे. मात्र, सध्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पूर्वेकडे सरकल्याने राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होत असून पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमान सरासरी इतके राहील आणि त्यानंतर उन्हाची काहिली वाढेल, असे हवामान विभागाने सांगितले.
सध्या मध्य पाकिस्तान आणि आसपासच्या भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ९.६ किमी उंचीवर पश्चिमी विक्षोभाची स्थिती आहे. पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे भारताच्या विशेषतः उत्तरेच्या राज्यात अनेक भागात बर्फवृष्टी, गारपीट आणि वादळी पावसाची नोंद होत आहे. त्यात दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच गुजरात येथील काही भागांतही जोरदार पावसाची नोंद होत आहे.
राज्यातही मुख्यतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाळी हवामान कायम असून मागील चार- पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या दरम्यान झालेल्या पावसामुळे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने समस्यांमध्ये भर पडली आहे.
पुढील अंदाज काय
राज्यात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही तसेच त्यानंतर हळूहळू कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात काहीशी घट झाल्याने या भागातील नागरिकांना तीव्र उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रविवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे झाली. तेथील कमाल तापमान ३७.९ अंश सेल्सिअस इतके होते.
सोमवारी ‘यलो अलर्ट’ कुठे ?
सोमवारी विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता असून चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मुंबईतील हवा कशी?
मुंबईत मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरीही दुपारच्या वेळेस उन्हाचा तडाखा मुंबईकरांना सहन करावा लागतो. तसेच आर्द्रतेमुळे घामाच्या धारा आणि उकडा याचा त्रासही जाणवतो. रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३२.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ केंद्रात २५.२ आणि कुलाबा केंद्रात २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सोमवारी शहरातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पूर्वेकडे सरकल्याने राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी झाला आहे. पूर्व विदर्भातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. – एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे
