मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने कमाल तापमानात वाढ नोंदली जात आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत आहे. काही ठिकाणी कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. सोमवारीही राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मराठवाडा ते उत्तर कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सोमवारी पावसाचा इशारा कुठे ?

सोमवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यात सोलापूर, परभणी , बीड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया आदी भागातील तुरळक ठिकणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडाकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे या भागांना सोमवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट विभागात, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभागात, सातारा आणि सातारा घाट विभागात, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर दक्षिण कोकणात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

मुंबईचे हवामान कसे असेल ?

रविवारी मुंबईतील कमाल तापमानात घट झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोमवारी मुंबईतील आकाश निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळेस काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.