मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी पावसाची नोंद होत असून काही प्रदेशात मंगळवारी मुसळधार, तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पुढील तीन – चार दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रदेशात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भातही वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन झाल्यापासूनच पावसाचे प्रमाण असमान असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोकण प्रदेशातील काही जिल्ह्यात, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही प्रदेशात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, अजूनही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. दरम्यान, सध्या बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापासून दक्षिण गुजरातपर्यंत एक लांब कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) पसरला आहे. त्यामुळे गुजरातमधील काही भागांसह राज्यातील कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची नोंद होत आहे. तसेच राज्यातील इतरही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी नोंदल्या जात आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने राज्यातील नाशिक घाट विभाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा घाट विभाग आदी भागांना बुधवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे, तर पुणे घाट विभागाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे या भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. तसेच सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण विदर्भाला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
