मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जून महिन्यापासून असणारी पावसाची तूट अधिकच वाढली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनच्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात मागील काही दिवसांच्या तुलनेत उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील तीन – चार दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला तरीही त्यांनतर २ ते ४ अशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दीर्घकालीन हवामानाचे अंदाज जाहीर केले. संपूर्ण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला असून दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्क्यांहून कमी पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता असली तरीही बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच विविध समस्यांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थिती पुढील काही महिन्यात अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत राहण्याची शक्यता जगभरतील हवामान तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

रात्रीही उकडा वाढणार

सप्टेंबरमध्ये देशातील बहुतांश भागात दिवसाचे आणि रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रामधील काही भागात कमाल तापमान सरासरीहून अधिक, तर काही भागात तापमान सरासरी इतके राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या काही भागात पावसाची नोंद होत नसल्याने, तसेच उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाड्यात काहीशी वाढ झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्यास रात्री उकाडा अधिक जाणवतो. यंदा उन्हाळ्यात अनेक दिवस ही स्थिती कायम होती. त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ उष्णतेचा सामना करावा लागला होता.

पुढील चार दिवस हलक्या सरींचा शक्यता

मागील काही दिवस राज्यात वादळी पावसाच्या प्रभावामुळे काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत होती. मागील चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी होता. पुढील तीन – चार दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.