मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू पुढे सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या वादळी पावसाची नोंद होत आहे. हे क्षेत्र छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधून पुढे सरकत असून या राज्यांच्या लगतच्या प्रदेशावरही वादळी पावसाचा प्रभाव आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची कामगिरी असमाधानकारक राहिली. या दरम्यान मुसळधार पावसासाठी आवश्यक असणाऱ्या हवामान प्रणालीचा अभाव असल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. दरम्यान, मोसमी पावसाच्या हंगामाच्या उत्तरार्धात कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून प्रशांत महासागरातील ”एल निनो” स्थितीची तीव्रता वाढेल, अशी शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे उर्वरित हंगामात चांगला पाऊस झाल्यास पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होणार आहे.
सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव काही राज्यांवर आहे. महाराष्ट्रातील विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव सर्वाधिक असून गुरुवारी या प्रभावाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात या प्रदेशात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण काहीसे वाढेल, अशी शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील काही भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारपर्यंत वादळी पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान प्रणाली सक्रिय राहिल्यास १० सप्टेंबरपर्यंत अनेक भागात पावसाचा अंदाज आहे.
देशात १४ टक्के तूट
दरम्यान, जून महिन्यापासून संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण असमान असल्याने अनेक भागात पावसाची तूट आहे. संपूर्ण देशात आतपर्यंतच्या हंगामात सरासरी पावसाहून १४ टक्के कमी पाऊस झाला आहे तर महाराष्ट्रात हेच प्रमाण १२ टक्के इतके आहे. ऑगस्टमध्येही पावसाने ओढ दिल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज वादळी पावसाची शक्यता कुठे ?
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागात आज वादळी पावसाची शक्यता असून राज्यातील उर्वरित बहुतांश भागात हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.
