मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाळी हवामान कायम आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचीही नोंद होत आहे. शनिवारपर्यंत राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. मात्र, राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे. यामुळे रविवारी मराठवाड्यातील आणि पश्चिम विदर्भातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
सध्या मध्य पाकिस्तान आणि आसपासच्या भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ९.६ किमी उंचीवर पश्चिमी विक्षोभाची स्थिती आहे. पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे भारताच्या विशेषतः उत्तरेच्या राज्यात अनेक भागात बर्फवृष्टी, गारपीट आणि वादळी पावसाची नोंद होत आहे. यात दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच गुजरात येथील काही भागांतही जोरदार पावसाची नोंद होत आहे. राज्यातही मुख्यतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाळी हवामान कायम असून मागील चार पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाची नोंद झाली.
यादरम्यान झालेल्या पावसामुळे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने समस्यांमध्ये भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे असून हवामान विभागाकडून ७ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.
हवामान अभ्यासकांच्या मते, उत्तर भारतावर आणखी एका पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव ७ ते १० एप्रिलच्या दरम्यान पडणार आहे. हा प्रभाव आधीच्या प्रभावाहून अधिक तीव्र असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यांनतर मात्र पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज असून १२ एप्रिलनंतर भारतीय उपखंडात अवकाळी पावसाची शक्यता कमी असून उन्हाळा अधिक तीव्र होईल अशी शक्यताही हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. राज्यात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही तसेच त्यांनतर हळूहळू कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अजून ‘यलो अलर्ट’ कुठे ?
रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात परभणी, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
