मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पश्चिमी विक्षोभाच्या (वादळाच्या ) प्रभावामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होत आहे. सध्या वादळाचा प्रभाव पूर्वेकडे सरकला असून यामुळे राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच काही भागात उष्णतेची लाटसदृश स्थिती कायम असून बहुतांश भागातील हवामान कोरडे आहे.
राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात मागील दोन दिवसांपासून काहीशी घट नोंदली जात आहे. विदर्भातील कमाल तापमानातही काहीशी घट नोंदली जात असली तरीही कमाल तापमान ४१ ते ४४ अंशाच्या दरम्यान नोंदले जात असून गुरुवारी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे उष्णतेची लाटसदृश्य स्थिती होती, तर शुक्रवारीही अमरावती, वर्धा आणि नागपुर आदी जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती राहील, अशा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
यामुळे शुक्रवारी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील ३ दिवसात कमाल तापमानात १ ते ३ अंशांनी घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुढील तीन चार दिवसात राज्यातील किमान तापमानात १ ते २ अंशांनी हळूहळू घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसाची शक्यता कुठे ?
दरम्यान, पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पूर्वेकडे सरकला असून यामुळे पुढील तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात शनिवारी २ मे रोजी यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर आदी भागात तर रविवारी ३ मे रोजी अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागात पावसाची शक्यता आहे. तर सोमवारी ४ मे रोजी पावसाचा प्रभाव काहीसा कमी होणार असून या दिवशी यवतमाळ आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाकडून मे महिन्यातील हवामानाचे अंदाज प्रसिद्ध करण्यात आले असून मे महिन्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान दिलासादायक असेल, अशी शक्यता असून दुसऱ्या आठवड्यात काही भागातील कमाल तापमानात काहीशी वाढ होऊन कमाल तापमान सरासरी तापमानाहून अधिक नोंदले जाईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
