मुंबई : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागातून पाऊस माघारी फिरला. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत असून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील काही भागात मंगळवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश, तर कोकण प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून पावसाचा प्रभाव गुरुवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.

संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसाचे प्रमाण कमीच राहिले, त्यामुळे निम्म्याहून अधिक राज्यात पावसाची मोठी तूट कायम आहे. दरम्यान, मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून पुढील काही दिवसात महाराष्ट्रातूनही पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईत वाऱ्यांचा वेग अधिक होता. तसेच काही भागात अवघ्या दोन तासात ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. मुंबई (सांताक्रूझ), अलिबाग, रायगड आणि पालघर येथे मंगळवारी प्रतितास २२ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. रायगड आणि ठाणे जिल्ह्याला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी पावसाची नोंद झाली. तसेच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भागातही मंगळवारी पाऊस झाला.

कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्र, कोकण प्रदेशातील काही जिल्ह्यांत बुधवारीही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मराठवाड्यातील अंतगर्त भागातही पावसाची शक्यता आहे. हवामान प्रणाली सक्रिय राहिल्यास परतीच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक भागात सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?

मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, बीड आदी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाट विभागात आज वादळी पावसाची शक्यता असून या भागांना आज हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.