मुंबई : बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे मागील दोन – तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. यात प्रामुख्याने कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर आजही वादळी पावसाचा प्रभाव राहील, असा अंदाज असून हवामान विभागाने काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यतावर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे अनेक भागात असलेली पावसाची तूट कायम असून त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाली असली तरीही राज्यात त्या प्रणालीचा प्रभाव कमी असल्याचे मागच्या काही दिवसांच्या पावसाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असून बहुतांश जिल्ह्यात कोरडे हवामान नोंदले जात आहे.

पुढील तीन ते चार दिवस राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याने मागील काही दिवसांच्या तुलनेत उकाड्यात काहीशी वाढ झाली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यातही उकाड्यात काहीशी वाढ होईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

वादळी पावसाचा प्रभाव कधीपर्यंत ?

मोसमी पावसाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशात सरासरीहून कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या मध्य प्रदेश, झारखंड, राज्यस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यातील काही भागात चांगला पाऊस नोंदला जात आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा प्रभाव रविवारपासून कायम होता. आजही काही भागात पावसाची शक्यता असली तरीही गुरुवारपासून वादळी पावसाचा प्रभाव कमी होऊन पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचाअंदाज आहे, असे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या महितीनुसार दिसून येत आहे.

आज वादळी पावसाची शक्यता कुठे ?

मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुणे घाट विभाग, नाशिक आणि नाशिक घाट विभाग आणि जळगाव आदी भागात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. यात पुणे घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या सर्व भागांना बुधवारी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.