मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने ९ ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्याची पूर्तता करण्यासाठी पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी बैठकांचा खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऐन गणेशोत्सवात एसटी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा : मुंबई : पालिका कार्यालयांत आमदारांच्या फेऱ्या; आरोग्य शिबिरे, मतदारांच्या प्रश्नांसाठी पत्रप्रपंच

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढतील फरक दूर करावी, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी, मागील करारातील त्रुटी दूर करावी, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमध्ये बदल करावा, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी या मागण्यांसाठी सर्व एसटी कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृती समितीचे संदीप शिंदे, हनुमंत ताटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बुधवारी मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक पार पडली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. या मागण्यांमुळे येणारा वित्तीय भार आणि त्याची सांगड कशाप्रकारे घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तातडीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : उजव्या विचारसरणीच्या पाच आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुधवारी बैठक पार पडली. मात्र, वित्त विभागाकडून परिपूर्ण अहवाल आला नव्हता. त्यामुळे वित्त विभागासोबत कृती समितीच्या दोन बैठका घेऊन २० ऑगस्टपूर्वी त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर परिपूर्ण अहवालानंतर मुख्यमंत्र्यांसोबत २० ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक होईल. बैठकीनंतर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ३ सप्टेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन होईल.

संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना