मुंबई : मुळशी तालुक्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या ढिसाळ कार्यामुळे राजकीय पक्षाशी संबंधित प्रकरणांकडे डोळेझाक करण्याच्या कार्यपद्धतीमुळे टीकेचा धनी बनलेल्या राज्य महिला आयोगाला अखेर जाग आली आहे. आयोगातील रिक्त १७ पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली आहे.
आयोगाकडे वर्षाला नऊ हजाराच्या आसपास महिलांच्या तक्रारी येतात. मात्र त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आयोगाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. आयोगाच्या प्रभारी सचिवांकडे इतर दोन शासकीय महामंडळाचा कार्यभार आहे. आयोगाची चार सदस्य पदे रिक्त आहेत. पुरेसे समुपदेशक नाहीत. कार्यालयीन जागा अपुरी आहे. निधीमध्ये कपात केली जात आहे. प्रतिनियुक्तीच्या कर्मचाऱ्यांवर आयोगाचा कारभार कसाबसा चालू आहे. इत्यादी बाबी ‘लोकसत्ता’ने समोर आणल्या होत्या. त्यासंदर्भात ‘राज्य महिला आयोगातील अनेक पदे रिक्त’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने २९ मे रोजी प्रकाशित केले होते.
आयोगाने याची दखल घेत तातडीने कार्यवाही केली आहे. आयोगाला एकुण ३५ पदांची मंजुरी आहे. पैकी १८ पदांवर कर्मचारी कार्यरत होते, मात्र १७ पदे रिक्त होती. सर्व रिक्त पदांवर बाह्ययंत्रणेव्दारे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आजमितीस आयोगातील एकही पद रिक्त नाही, असे ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालया’ने पत्राव्दारे कळवले आहे.