व्यवसाय किंवा उद्योग करणं हे मराठी माणसाचं काम नाही असाच सर्वसाधारण समज आहे. त्यातही एखादी महिला त्यामध्ये उतरत असेल तर संकटालाच निमंत्रण. पण मेहनत करायची, नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी असेल आणि ठरावीक ध्येय समोर ठेवून कोणतंही काम केलं तर यश हे मिळतंच. बोरिवली येथील मराठमोळे पदार्थ मिळणाऱ्या ‘गोडवा- द देसी फूड हब’च्या सर्वेसर्वा गीतांजली शिंदे यांनी हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे. पती राजेश शिंदे आणि इतर कुटुंबीयांचा त्यांना मिळालेला पाठिंबाही तितकाच मोलाचा आहे. लग्न होऊन सासरी आल्यावर सासरच्याच कॅटरिंगच्या व्यवसायात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. ही गोष्ट २००० सालातली. तेव्हा बाभई नाक्याजवळच भाडय़ाने घेतलेल्या जागेवर घरातच जेवणाचे पदार्थ बनवून आणून त्या विकत असत. पण हळूहळू नवनवीन पदार्थ त्या स्वत: बनवायला शिकल्या आणि २००४ साली ‘गोडवा’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थामध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करून लोकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असल्याचे गीतांजली सांगतात. त्यामुळे भाजणीच्या थालीपीठासोबतच कांदा, चीज, पनीर, व्हेज, कॉर्न आणि फराळी असे थालीपीठाचे पाच वेगवेगळे प्रकार येथे मिळतात. पराठा ही नॉर्थ इंडियन हॉटेलांची मक्तेदारी मानली जाते. मात्र इथले आलू, पनीर, मिक्स व्हेज, कोबी पराठा चवीला वेगळे आहेत.
लहान मुलांना आणि तरुणांना बाहेरचे पदार्थ म्हणजेच फास्ट फूड जास्त खायला जास्त आवडतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काही वेगळे प्रयोग येथे करण्यात आले आहेत. आलू टिक्की व्रॅप, स्प्राऊटेड व्हेज व्रॅप, पनीर व्रॅप, मका पॅटीस हे प्रकार ‘गोडवा’ची खासियत आहे. जुन्या आणि नव्याचा फ्युजन असलेल्या या पदार्थाद्वारे पौष्टिक घटकही पोटात जातात आणि फास्ट फूड खाल्ल्याचं समाधानही मिळतं. उपवासाचं प्लॅटर नावाचा एक प्रकार इथे आहे, ज्यामध्ये साबुदाणा वडा, उपवास थालीपीठ, फराळी पॅटिस प्रत्येकी एक नग, साबुदाणा खिचडी आणि पीयूष यांचा समावेश असतो. सकाळच्या नास्त्यामध्येही साधा उपमा आणि पोह्य़ासोबतच क्रंची चटपटा पोहा आणि डिलिशिअस उपमा असे वेगळे प्रकार मेन्यूमध्ये टाकण्यात आले आहेत. आंबोळी, घावण, आंबोळी उसळ, मिक्स व्हेज आंबोळी बरेचदा मराठी हॉटेलच्या मेन्यूमध्येही क्वचितच सापडणारे पदार्थही येथे दररोज मिळतात. मिसळीमध्येही साधी, कोल्हापुरी, दही आणि गोडवा स्पेशल मिसळ पाव अशा व्हरायटी आहेत. इथल्या मिसळीची उसळ ही मोड आलेल्या पाच वेगवेगळ्या कडधान्यांपासून तयार केलेली आणि विशेष मसाला वापरून केलेली असते, त्यामुळे तिची चव नक्कीच वेगळी आहे.
प्रत्येक सणाच्या निमित्ताने पारंपरिक पदार्थही तयार केले जातात. ऋषिपंचमीला ऋषीची भाजी, संक्रांत विशेष भोगीची भाजी, होळीला पुरणपोळ्या (ज्या वर्षभरही मिळतात) कटाची आमटी, नागपंचमीला पातोळे, खांडवी, धोंडस (मालवणी गोड पदार्थ) हे पदार्थ असतात. दिवाळीला फराळाचे सर्व पदार्थ तयार केले जातात आणि त्याची मागणीनुसार विक्री केली जाते. गोड पदार्थामध्येही दुधी हलवा, गाजर हलवा, खरवस, मूग डाळीचा हलवा, गव्हाची पुरणपोळी, नारळवडी, तेलपोळी, गूळपोळी, शाही शेवया खीर (शनि-रवी) मिळते. इथल्या उकडीच्या मोदकांना विशेष मागणी असते. रवा, बेसन, राघवदास, नाचणी, मूग, हिरव्या मुगाचे लाडूही मिळतात.
गेले तीन वर्षे दर बुधवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवसभर मिसळपाव, बटाटावडा, कोथिंबीर वडी, थालिपीठ, पोहे, उपमा, कॉफी आणि पीयूष या पदार्थावर २५ टक्के सूट असते. बाभईनाक्यासोबतच शिंपोली आणि चारकोपलाही ‘गोडवा’च्या शाखा आहेत. तिथे बसून खाण्याची व्यवस्था नसली तरी स्नॅक्सपासून जेवणाचे सर्व पदार्थ पार्सल घेऊन जाता येतात. त्याशिवाय कॅटरिंगच्याही ऑर्डर स्वीकारल्या जातात. प्रत्येकवेळी केवळ गोड पदार्थानीच तोंड गोड होतं असं नाही, तर आपुलकीने केलेल्या कुठल्याही पदार्थाने केलेल्या पदार्थाचा गोडवा वाढत असतो. अशीच काही ‘गोडवा’ची खासियत आहे त्यामुळे इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
गोडवा- द देसी फूड हब
कुठे- शॉप नं. ९, रामकृष्ण सोसायटी, बाभई नाका, महापालिका शाळेच्या समोर, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई
कधी- सोमवार ते रविवार सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत
प्रशांत ननावरे
nanawareprashant@gmail.com
@nprashant