मुंबई : महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरविले आहे. त्यांच्याकडून सहा महिन्यांच्या अनुदानाची नऊ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहने असलेल्या पाच लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता आलेले अर्ज स्वीकृत करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचे अनुदान पात्र महिलांना दिले जाते. आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून माघार घेतली आहे. सरकारच्या या योजनेला २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही ११ लाख अर्जांची छाननी प्रलंबित असून ११ लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे.

राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत सुमारे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. सरकारने प्रादेशिक परिवहन विभागाकडे ज्या महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहनांची नोंद आहे याचा शोध घेतला असता सुमारे लाखभर अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले असून त्यांना आता अपात्र करण्यात आले आहे.

शासनाची फसवणूक

पाच लाख बहिणी अपात्र ठरल्या असल्या तरी जुलै ते डिसेंबर या काळात देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या महिलांना जानेवारीपासून लाभाची रक्कम दिली जाणार नाही. परंतु आधी बँक खात्यात जमा केलेली रक्कम परत घेणे उचित ठरणार नाही, असेही तटकरे यांनी म्हटले आहे. यामुळे दरमहा १५०० रुपये याप्रमाणे जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांसाठी पाच लाख बहिणींनी देण्यात आलेली ४५० कोटींची शासनाची रक्कम पाण्यात गेली आहे.

रक्कम वाढणार असल्यानेच कात्री?

महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात हे अनुदान १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती आधीच गंभीर असताना दरमहा ६०० रुपये वाढ करण्यात आल्याने सरकारच्या तिजोरीवर आणखी बोजा पडणार आहे. यामुळेच अर्थसंकल्पापूर्वी घाईघाईत ५ लाख बहिणींना अपात्र ठरवून सरकारने बोजा कमी केला आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्यांचा तपशील

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी – २,३०,०००

६५ वर्षांपेक्षा अधिक वय – १,१०,०००

कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००

एकूण अपात्र – ५ लाख

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharastra government disqualified 5 lakh women who took benefits of ladki bahin scheme by violating norms zws