मुंबई : महारेराचे नवे ‘महाकृती’ संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित झाले असून या संकेतस्थळाचा वापर प्रभावीपणे विकासक, तक्रारदार, ग्राहक, वकील आणि अन्य नागरिकांना करता यावा यासाठी महारेराकडून प्रशिक्षण दिले जात आहे. हे संकेतस्थळ कसे वापरावे, तक्रारी कशा नोंदवाव्यात यासह विविध सुविधांची माहिती चित्रफितीद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. हेही वाचा >>> अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; मिठागराची २५६ एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी विकासक, दलालांना महारेरा नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. तर प्रकल्पांची नोंदणीही संकेतस्थळाच्या माध्यमातूनच केली जाते. त्याचवेळी ग्राहकांना आपल्या तक्रारी संकेतस्थळावर नोंदवाव्या लागतात. एकूणच महारेराचे संकेतस्थळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशावेळी या संकेतस्थळामध्ये काळानुरुप बदल करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे महारेराने नवे ‘महाकृती’ संकेतस्थळ तयार करून घेतले आहे. हे संकेतस्थळ अधिक प्रभावी आणि अत्याधुनिक असल्याचा दावा महारेराकडून केला जात आहे. १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून महाकृती संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. हे संकेतस्थळ कसे हाताळावे याची माहिती संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी महारेराने ‘महाकृती’ संकेतस्थळ कार्यान्वित होण्याआधी काही दिवस आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर काही दिवस प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संकेतस्थळ कार्यान्वित होण्याआधी विकासक, प्रवर्तकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहक, तक्रारदारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचवेळी हे संकेतस्थळ कसे वापरावे याची माहिती देणारी एक चित्रफित संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : ठाकरे गट, ‘अभाविप’विरोधात अपक्षांची एकजूट आतापर्यंत महारेराच्या प्रशिक्षणाचा ५५० विकासक, ३५० दलाल आणि २५० हून अधिक वकील आणि तक्रारदारांनी लाभ घेतला आहे. तर आतापर्यंत २७६६ नियमित संकेतस्थळ वापरकर्त्यांनी नवीन संकेतस्थळावर लाॅगइन करून त्यांचे पासवर्ड बदलले आहे. ५८१ प्रवर्तकांनी त्यांची संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करून ८ प्रवर्तकांनी नवीन प्रकल्पासाठी नोंदणी केली आणि एकाने नूतनीकरणासाठी अर्ज केला. शिवाय नवीन दलाल नोंदणीसाठी २१ जणांचे अर्ज आले असून सहा दलालांनी नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. ८४ दलालांनीही नवीन संकेतस्थळावर त्यांची माहिती अद्ययावत केली आहे. १७ ग्राहकांनी नवीन संकेतस्थळावर तक्रारी दाखल केल्या आहेत.