सरकार स्थापन करण्याची  संधी देण्याची मागणी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अन्य मित्रपक्षांच्या १६२ आमदारांच्या सह्य़ांची यादी सोमवारी राज्यपालांना सादर करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे शपथ देण्यात आली आहे, त्यांच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

राज्यात शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेसची सरकार स्थापन करण्याची जुळवाजुळव सुरु असतानाच, शनिवारी  सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले. बहुमत नसताना  फडणवीस, अजित पवार यांना शपथ देण्याच्या प्रक्रियेला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करुन दाखविण्याची मागणी या पक्षांनी न्यायालयात केली आहे.

राज्यपाल दिल्लीत असल्याने त्यांच्या कार्यालयातील अव्वर सचिव रमेश डिसुझा यांच्याकडे आघाडीच्या १६२ आमदारांच्या सह्य़ांची यादी असलेले निवेदन सादर करण्यात आले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलकाना जयंत पाटील यांनी सांगितले की, विधानसभेच्या १६२ आमदारांच्या सह्य़ा असलेले पत्र राज्यपाालांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, परंतु त्यांच्याकडे संख्याबळ पुरेसे नव्हते, असे त्यांनीच आधी सांगून सरकार बनविण्यास असमर्थता  व्यक्त केली होती.

आजही त्यांच्याकडे पुरेसे बहुमत नसल्यामुळे ते बहुमत सिद्ध करु शकणार नाहीत. बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, स्वभिमानी शेतकरी संघटना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, व अपक्ष सदस्यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करु शकतो, तसा दावा आम्ही राज्यपालांकडे केला आहे.

फडणवीस यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे सरकार  स्थापन करण्याचा दावा केला.  फडणवीस सरकार  विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरतील म्हणून विधानसभा बरखास्त करण्याचे काहीही कारण नाही, आम्हाला सरकार स्थापन करण्याची करण्याची संधी दिली जावी, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.