मुंबई : पेपर फुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीट परीक्षा २१ जून रोजी घेण्याचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (एनटीए) जाहीर करण्यात आले. त्यामुळे २१ जून रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आला आहे. ही परीक्षा २१ जूनऐवजी २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध केले आहे.
नव्याने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार होती. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महत्त्वाची असलेली नीट यूजीचा ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर फुटल्यामुळे एनटीएने नीट परीक्षा २१ जून रोजी पुन्हा नव्याने घेणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. देशभरातून जवळपास २२ लाख विद्यार्थी
या परीक्षेला बसतात. ही परीक्षा देशातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येते. नीट व टीईटी या दोन्ही परीक्षांसाठी राज्यातील अनेक केंद्र सारखेच आहेत. त्यामुळे टीईटी परीक्षा सुरळीत पार पडावी व विद्यार्थी हित लक्षात घेता राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षापुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
असे आहे परीक्षेचे वेळापत्रक राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा २१ जूनऐवजी २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. टीईटीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना १६ ते २८ जून या कालावधीत प्रवेश पत्राची प्रिंटआऊट काढून घेता येईल. टीईटी परीक्षा पेपर १ २८ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. त्याचप्रमाणे टीईटी परीक्षा पेपर २ दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजता या कालावधीत होणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेने काही कारणास्तव परीक्षेच्या तारखा बदल केला असला तरी यापुढील काळात काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
