मुंबई : वासाहतिक काळात महाराष्ट्रात सांस्कृतिक बंड उभारुन सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे सुधारणावादी विचावंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा सात भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहेत. या साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुवारी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी मराठी भाषेतील दर्जेदार वाङ्मय अन्य भाषांमध्ये गेले पाहिजे तसेच अन्य भाषांमधील वाङ्मय मराठी भाषेत आले पाहिजे. भाषेला समृद्ध्घ करण्यासाठी आदान, प्रदान महत्वाचे आहे. यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष असून भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यानिमित्ताने विविध उपक्रम राबविणार आहेत.
याचा भाग म्हणून महात्मा फुले यांचे वाङ्मय साहित्य अकादमीतर्फे सात भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासन मदत करेल, असे मंत्री शेलार यांनी जाहीर केले. महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीने २०१२ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा ८६१ पानांचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.कार्यशाळेत लेखिका मंजिरी धामणकर, डॉ. शितला प्रसाद दुबे, अजित मन्याल, आलोक सिंह, प्रशांत वर्मा यांच्यासह अकदामीचे सचिव सचिन निबांळकर, विविध भाषेतील अनुवादक तसेच अभ्यासक सहभागी झाले होते.
मुक्तीचा जाहीरनामा :
महात्मा फुले समग्र वाङ्मय’ हा आधुनिक भारताचे महान समाजसुधारक महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या संपूर्ण क्रांतिकारी साहित्याचा अधिकृत संग्रह आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती’ द्वारे हे समग्र साहित्य प्रकाशित केले आहे. याचे संपादन प्रा. हरी नरके आणि डॉ. य. दि. फडके या अभ्यासकांनी केले आहे. हे वाङ्मय शोषित, वंचित आणि स्त्री मुक्तीचा जाहीरनामा मानला जातो.
