मुंबई : अदानीच्या घशात मुंबई घातली जात आहे. नगरसेवकांची उघडपणे खरेदी होत आहे. मंत्र्यांचा चालक १५० कोटींची मालमत्ता घेतो. शक्तिपीठच्या आडून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत. कोणत्या भाषेत बोलायचे हे सुद्धा सरकार सांगू लागले असून महायुती सरकार भाजपचा राज्यात महाराष्ट्रविरोधी अजेंडा राबवते आहे, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रविवारी केला. तसेच सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
सोमवारपासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज ‘अजिंक्यतारा’ या अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे जोरदार वाभाडे काढले.
बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते बंटी ऊर्फ सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेतील प्रतोद शशिकांत शिंदे, शिवसेना (उद्धव ठाकरे) विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, विधानसभेतील प्रतोद सुनिल प्रभू, विधान परिषदेतील गटनेते ॲड. अनिल परब, आमदार सचिन अहीर आदी बैठकीला होते.
गेल्या पाच वर्षात अनेक प्रकल्प गुजरातला नेले. मुंबईमध्ये जगातला सर्वात मोठा घोटाळा धारावीमध्ये झाला. राजकीयदृष्ट्या मुंबई जिंकू शकत नसल्याने मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली जात आहे. समृद्धी महामार्गावर नदी वाहते आहे. सगळे घोटाळे लाडक्या ठेकेदार योजनेमधून झाले असून भाजप राज्यात महाराष्ट्र विरोधातील अजेंडा चालवत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
महायुती सरकार भ्रष्टाचारात अखंड बुडाले आहे. पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. निधीसाठी टक्केवारी मोजावी लागते. सत्ताधारी अनेक गुन्ह्यात सामील आहेत. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
नगरसेवकांची राजरोसपणे खरेदी असून या सरकारने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त केला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी बंटी पाटील यांनी केली.
बहुतांश मंत्र्यांवर नावानिशी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र सरकारचे नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी पत्रकार परिषदेत ‘ब्र’ सुद्धा उच्चारला गेला नाही. विरोधी पक्षनेतेपद देण्याची आठवण मात्र करण्यात आली. तीन पक्ष वगळता शेकाप, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी बैठकीला नव्हते.
चहा नको
या भ्रष्ट सरकारचा चहा पिल्यास पाप लागेल. विकृत सरकारचा आम्ही चहादेखील पिणार नाही, असे स्पष्ट करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या शासकीय चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.