वीजबिलाची रक्कम कमी करण्याकरिता १५ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अशोक देसले असे या त्याचे नाव असून तो महावितरणच्या मुरबाड कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता.
मुरबाडच्या महावितरण कार्यालयामध्ये विद्युत बिल कमी करण्याकरिता गेलेल्या तक्रारदाराकडे  देसले याने १५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने मुरबाडच्या माळशेज येथील अ‍ॅक्सिस बँकेसमोर सापळा रचला होता. दुपारी तीन वाजता तक्रारदाराकडून रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसले यास रंगेहाथ अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली.