मुंबई : सध्याचे वीज मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावण्याकरिता महावितरणकडून धाडण्यात येत आलेल्या संदेशांमुळे राज्यातील वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनी मीटर बसविण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. संदेशाची भाषा धमकीची असून, स्मार्ट मीटर लावण्यासाठीचे हे दबाबतंत्र असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. महावितरणने मात्र हा दावा फेटाळून लावत, हा संदेश स्मार्ट मीटर विषयी माहिती देणारा असून ग्राहकांनी गैरसमज करून घेऊ नये, असा खुलासा केला आहे. ४८ तासांत जुने मीटर बदलले नाही तर वीज प्रवाह रोखणार किंवा जबरदस्तीने वीज मीटर बदलणार, असा याचा अर्थ नसून ग्राहकांनी निश्चिंत राहावे, असे स्पष्टीकरण महावितरणकडून करण्यात आले.

ग्राहकांच्या संमतीनेच स्मार्ट मीटर लावले जात आहेत. यामुळे वीज देयकात अचुकता येते. तसेच, स्मार्ट मीटर स्वीकारलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरावर सवलत (टाइम ऑफ डे-टीओडी) दिली जात आहे. आतार्पंयत ७० लाख ग्राहकांना या योजनेमुळे २,२३५ कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. यामध्ये १५,९०७ ग्राहक उद्योग क्षेत्रातील आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

राज्यात एकूण ग्राहकांपैकी जवळपास ५० टक्के म्हणजे १ कोटी २० लाख ग्राहकांनी स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारला आहे. इतर ग्राहकांकडे टप्प्याटप्प्याने मीटर बसविले जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून, भारत सरकारच्या ऑगस्ट, २०२१च्या अधिसूचनेचा हवाला देत आलेल्या संदेशांमुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. मीटर बदलण्याची प्रक्रिया मोफत आहे, यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होते, मोबाईल अॅपद्वारे विजेचा वापर नियंत्रित करू शकता, असे या संदेशात नमूद करत ग्राहकांचे मन वळविण्यात येत आहे. राज्यात सध्या अदानीसह चार कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे काम देण्यात आले आहे.