लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचा जनाधार घटला, उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीमुळे जनतेची सहानुभूती आहे, असा चुकीचा प्रचार करण्यात येत असला तरी, राज्यातही महायुतीची मते निवडणुकीपेक्षा वाढली असून आपला जनाधार कायम आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दादर येथील भाजप कार्यालयात झालेल्या आमदारांच्या बैठकीत फडणवीस म्हणाले,‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पाठिंबा दिल्याने पंडित नेहरूंनंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. राज्यातही महायुतीची मते गेल्या निवडणुकीपेक्षा वाढली असून ५१ टक्के मतांसाठी तीन साडेतीन टक्के आणखी मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतील. तर लोकसभेपेक्षा दीड टक्के मते जरी अधिक मिळविता आली, तरी विधानसभा निवडणूक जिंकता येईल आणि हे कठीण नाही.’

हेही वाचा >>>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती; श्रीकांत शिंदेंकडे पक्ष संघटनेची जबाबदारी

‘अंकगणितात कमी पडलो’

महायुती व महाविकास आघाडीच्या मतांमध्ये ०.३ टक्के मतांचा फरक असून मुंबईत तर महायुतीला त्यांच्यापेक्षा दोन लाख मते जास्त आहेत. त्यांना मुस्लिम मतांमुळे आणि निवडणुकीतील अंकगणितामुळे अधिक जागा मिळाल्या. महायुतीला ११ जागा पाच टक्क्यांपेक्षा कमी मतांनी गमवाव्या लागल्या. राजकीय अंकगणितात आम्ही कमी पडलो.

ठाकरेंना मराठी मते कमीच

ठाकरे गटाला मराठी माणसाची फारशी मते मिळालेली नाहीत, हे वरळी, शिवडी व राज्यातील अन्य विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारीतून दिसून येते. ठाकरे गटाला मराठी माणसाची सहानुभूती असती, तर ती मुंबई व कोकणात दिसायला हवी होती. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील जागा मिळाल्या असत्या. मुंबईतील जागा मुस्लिम मतांमुळे मिळाली असून कोकणातून ठाकरे गट हद्दपारच झाला आहे.

उणीदुणी काढण्याची वेळ नाही

भाजप आमदार व नेत्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काम केले आणि त्या पक्षातील नेत्यांनीही भाजप उमेदवारांसाठी काम केल्याचे मतांच्या आकडेवारीतून दिसून येते. काही ठिकाणी नेत्यांनी काम न केल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. त्या वरिष्ठ नेत्यांनी समजून घ्याव्यात पण तीनही पक्षाचे नेते व प्रवक्ते जाहीरपणे एकमेकांची उणीदुणी काढत आहेत, हे योग्य नसून ही ती वेळ नाही. मी आमदार नितेश राणे यांनाही बोललो आहे. या मुद्द्यांवर माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. तीनही पक्षाच्या प्रवक्यांनी समजून उमजून व एकसुराने बोलले पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संविधानात बदल केला जाईल, महाराष्ट्रातील उद्याोग गुजरातला पळविले, यासह अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी खोटा प्रचार केला. त्यामुळे महायुतीला खोट्या प्रचाराविरोधातही लढावे लागले.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.