मुंबई : कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत (एकनाथ शिंदे) जुंपण्याची चिन्हे असून दोन्ही पक्षांनी अन्य पक्षांमधून अनेक नेत्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, डोंबिवली शहर प्रमुख ओमनाथ नाटेकर, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पालघरच्या माजी जिल्हाध्यक्ष ॲड. नम्रता वैती (ठाकूर), विभाग प्रमुख रवी थालकर, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राजन नाईक, किसन कथोरे आदी उपस्थित होते.

राज्यभरात शक्य होईल, तेथे महायुती एकत्र निवडणुका लढवेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी सांगितले असले, तरी कल्याण डोंबिवलीत भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये टोकाचे वाद आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी चंग बांधला असून अनेक नेते व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचा मुलगा दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक नेत्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता भाजपने कल्याण-डोंबिवली व वसई-विरारमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे),मनसे, बहुजन विकास आघाडी यांना खिंडार पाडले आहे.

डोंबिवलीचे मनसे उपशहर प्रमुख हरिश्चंद्र पराडकर, शाखा प्रमुख सचिन कोर्लेकर, लक्ष्मण नकाते, प्रदीप सागवेकर, हेमंत म्हात्रे, प्रवीण चव्हाण, ॲड. कविता म्हात्रे, शाखा अध्यक्ष गणेश यादव, विभाग अध्यक्ष समीर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आलेल्यांमध्ये शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वसईतील शहर प्रमुख साधना चव्हाण, ममता चव्हाण, विभाग प्रमुख सुनिता चव्हाण, विभाग अध्यक्ष भाग्यश्री सुतार, विद्या खामकर, राधिका डिसोजा, युवासेना विभाग प्रमुख सुशांत पाटील आदींचा समावेश आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपजिल्हा प्रमुख रामचंद्र दळवी, तालुका प्रमुख प्रकाश पवार, बाजार समिती सभापती बाळकृष्ण चौधरी, उपसभापती गुरुनाथ झुंजारराव, तालुका सचिव धनाजी दळवी, महिला आघाडी प्रमुख रेखा इसामे, युवा प्रमुख सागर कडव आदींनीही भाजपमध्ये प्रवेश केला.