मुंबई : राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी गेल्या अडीच वर्षांत राज्याने विकासाची जी गती घेतली आहे. त्याच गतीने महाराष्ट्र पुढे जाईल. महाराष्ट्र आता थांबणार नाही तर सर्व क्षेत्रांत राज्य अग्रेसर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी दिली.
महायुती सरकारच्या शपथविधीनंतर नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सरकारची पुढील दिशा स्पष्ट केली. निवडणुकीच्या दरम्यान लोकांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकार करेल. मात्र त्यापूर्वी राज्याची वित्तीय स्थिती विचारात घेतली जाईल. लाडक्या बहिणींच्या सन्माननिधीत वाढ करण्याचा निर्णय अर्थसंकल्प मांडताना घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नदीजोड प्रकल्प आणि सौरऊर्जा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांना आपल्या सरकारचे प्राधान्य राहणार आहे. २०२६पर्यंत राज्यात सौरऊर्जेचे १६ हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून नदीजोड प्रकल्पाची कामे सुरू केली जातील. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा विदर्भाचा विकास होत असून या भागात नवीन उद्याोग येत आहेत. आता नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला गती देण्यात येणार असून या प्रकल्पाला सांगली जिल्ह्यापर्यंत कोणताही विरोध नाही, त्यामुळे तेथे महामार्गाचे आरेखन अंतिम करून पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, मात्र या प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड विरोध होत असून शेतकऱ्यांशी चर्चा करूनच प्रकल्प पुढे नेला जाईल. विरोध कायम राहिला तर हा मार्ग सध्याच्या महामार्गाला जोडण्याबाबत किंवा त्याची दिशा बदलण्याबाबत विचार केला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी
विरोधकांचे संख्याबळावरून मूल्यमापन करणार नाही तर त्यांनी योग्य विषय मांडल्यास त्यांचा सन्मान केला जाईल. तसेच विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याबाबत अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. राज्यातील सध्याच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार सजग राहणार असून या योजनांचे सामाजिक परीक्षण करण्याची व्यवस्था केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
राजकीय संवाद राखणार
राज्यात गेल्या पाच वर्षांत बरीच उलथापालथ झाली. बऱ्याच घटना घडल्या. मात्र येत्या काळात राज्यातील राजकीय संवाद संपणार नाही, याची खबरदारी सरकार घेईल. राजकीय संवाद वाढला पाहिजे, तो कधी संपणार नाही याची खबरदारी सर्वच राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. गरज वाटल्यास शक्ती कायद्यात काही बदल केले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.
पहिली स्वाक्षरी वैद्याकीय मदतीवर
●मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
●तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच स्वाक्षरी होती. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्याकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
●चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्याकीय सहाय्यता कक्षाचा प्रारंभ केला होता.
वेगाने काम करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याच्या सूचना नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत गुरुवारी दिल्या. फडणवीस यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर मंत्रालयात जाऊन मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फडणवीस, शिंदे व पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत काही सूचना केल्या आणि अधिक गतीने व जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाची गती वाढवून चांगले निर्णय घेऊ. जनतेच्या अडीअडचणी व समस्या समजावून घेऊ, असे ते म्हणाले.