मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागल्याने, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष कमालीचा विकोपाला गेला आहे. मित्रपक्षानेच ऐनवेळी ‘दगाफटका’ केल्याचा थेट आरोप करत भाजपने आपल्या पराभवाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले आहे. तर दुसरीकडे, भाजपची ‘चुकीची उमेदवार निवड’ आणि त्यांच्याच पक्षातील ‘असंतोष व अंतर्गत बंडखोरी’ यांमुळे हा घात झाल्याचा पलटवार शिवसेनेने केला आहे. या निकालानंतर महायुतीमधील वरकरणी दिसणारी एकजूट मोडीत निघाली असून अंतर्गत सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी पायात पाय घातल्याने झालेल्या पराभवांवरूनही उभयता तोंडसुख घेत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

या पराभवानंतर गुरूवारी महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिकच तीव्र झाल्या. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी, “शिवसेनेने निवडणुकीत मित्रधर्म पाळला नाही,” असा थेट वार केला. भाजपच्या या हल्ल्याला शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले असून, “भाजपने आधी स्वतःच्या चुकीच्या रणनीतीचे आणि पराभवाचे आत्मपरीक्षण करावे,” असा खोचक सल्ला दिला आहे. परस्परांमधील संशयाचे वातावरण आणि भविष्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठीची महायुतीतील लढाई यामुळे अधिक अटीतटीची बनली आहे.

निकाल जिव्हारी

विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांतील निकालात महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपने, तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेने जिंकला. म्हणजेच महायुतीला शिक्षक मतदारसंघांत यश मिळाले, परंतु पदवीधर मतदारसंघांत एकही जागा राखता आली नाही.

भाजपचा मित्रपक्षावर ठपका

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. मात्र, शिवसेनेने ऐनवेळी अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने महायुतीतील मतभेद उघड झाले. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्यानंतरही पक्षाने सानप यांना पाठिंबा दिला. या भूमिकेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा आरोप नवनाथ बन यांनी केला. शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर विजय मिळवता आला असता, असा दावा बन यांनी केला. पुण्यातील एका जागेसाठी स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे मित्रपक्षांचे नुकसान झाले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली, असे त्यांचे म्हणणे आहे. एका जागेसाठी मित्रपक्षांना अडचणीत आणण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नसल्याचेही त्यांनी म्हटले.

भाजप नेते केशव उपाध्ये यांनीही, हा निकाल विरोधकांच्या यशापेक्षा महायुतीतील काही ‘हितचिंतकांच्या’ कर्तृत्वाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची संजीवनी दिली आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली, असा आरोप करत त्यांनी इतिहासातील तीच चूक पुन्हा होऊ नये, यासाठी आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. ‘एकाने प्रामाणिकपणे काम करायचे आणि दुसऱ्याने वेगळा सवतासुभा मांडायचा, असा संसार असतो का?’ असा सवालही उपाध्ये यांनी शिवसेनेचे नाव न घेता उपस्थित केला.

मित्रपक्षांना योग्य सन्मान द्या

भाजपच्या आरोपांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निवडीवरून भाजपला लक्ष्य केले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांपैकी एक जागा शिवसेनेला मिळावी, अशी पक्षाची पहिल्या दिवसापासून मागणी होती. मात्र, भाजपने पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर अशा तीन जागांवर उमेदवार जाहीर केले. पुणे शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी अर्ज मागे घेतला, तरी पुण्यातील एका जागेवर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी कायम होती, असे परांजपे यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने दिलेला उमेदवार पक्षाचा सदस्यही नव्हता, असा दावा त्यांनी केला. भाजपने पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तर कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असता. बाहेरच्या उमेदवारामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी व मतदारांनी त्याला नाकारले, असा आरोप करत परांजपे यांनीही भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. पुण्यातील दोन्ही मतदारसंघांत भाजपचे आमदार नसताना भाजपनेच दावा करणे कितपत योग्य होते, असा प्रश्न उपस्थित केला. सर्व जागा स्वतःच लढवायच्या आणि सर्व जागा स्वतःच जिंकायच्या, ही भूमिका महायुतीच्या हिताची नाही. मित्रपक्षांना योग्य सन्मान देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे थेट वार

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी भाजपच्या छुप्या विरोधावर मात करत विजय मिळवला. “अमरावतीची जागा शिवसेनेकडे असतानाही भाजपशी संबंधित तब्बल तीन उमेदवार बंडखोरी करून रिंगणात होते,” असा थेट आरोप परांजपे यांनी केला. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, चंद्रशेखर भुयार आणि डॉ. पवार हे महायुतीला सुरुंग लावण्यासाठी प्रचारात उघडपणे सक्रिय होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपने वरकरणी बंडखोरांवर कारवाईचे नाटक केले असले, तरी निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत या बंडखोरांची सक्रियता महायुतीचा घात करणारी ठरली, असा घणाघात त्यांनी केला. त्यामुळे ‘शिवसेनेला शहाणपण शिकवण्यापूर्वी भाजपने आधी स्वतःच्या घरात उफाळलेली बंडखोरी मोडून दाखवावी,’ अशा कडक शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी शिवसेनेच्या अब्दल सत्तार यांनी छुपा प्रचार केल्ल्याने भाजपचे सतीश चव्हाण यांचा पराभव झाला, असा थेट आरोप बन यांनी केला. यावर “विधानसभा निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी भाजपच्या प्रशांत बंब यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता, याची आठवण भाजपने ठेवावी,” असा पलटवार परांजपे यांनी केला. “या निवडणुकीत प्रशांत बंब यांनी नेमका कोणाचा छुपा गेम केला, याचा शोध बन यांनी आधी स्वतःच्या पक्षात घ्यावा,” असा बोचरा टोला परांजपे यांनी लगावला.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी शेवटपर्यंत बंडखोरीचे निशाण फडकवत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता, याकडे शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लक्ष वेधले. “निवडणुकीच्या तोंडावर सोले यांनी दिलेला पाठिंबा पोकळ होता. त्यांच्या अंतर्गत बंडखोरीने भाजपच्या हक्काच्या मतांना आधीच सुरुंग लावला होता,” असा दावा परांजपे यांनी केला.

युतीचा धर्म’ पायदळी

विधान परिषदेच्या या निकालांनी महायुतीमधील जागावाटप आणि भविष्यातील संघर्षाचे संकेत दिले आहेत. सत्तेत एकत्र असले तरी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची धडपड स्वतःचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठीच सुरू आहे. मात्र, ‘स्वतंत्र अस्तित्व’ जपण्याच्या या चढाओढीत ‘युतीचा धर्म’ पायदळी तुडवला गेला, तर त्याचे थेट पडसाद निकालांवर उमटतात, हेच या निवडणुकीने सिद्ध केले आहे.