मुंबई : बेस्टच्या तिकीटदरात महिलांना ५० टक्के सवलत, वांद्रे-कुर्ला संकुलात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारून दोन लाख तरुणांना नोकऱ्या, पाणीपट्टी दरवाढीला पाच वर्षे स्थगिती, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता दुप्पट करणार, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ, यासह अनेक योजना व आश्वासनांचा पाऊस महायुतीने रविवारी प्रकाशित केलेल्या वचननाम्यात पाडण्यात आला आहे. मुंबईतील मराठी माणसाला मुंबईबाहेर जावू देणार नाही, त्याला मुंबईतच हक्काचे घर दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम आदींच्या उपस्थितीत भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पक्ष महायुतीचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करण्यात आला. महायुतीने लाडक्या बहिणी, तरूण ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदी सर्वच घटकांसाठी अनेक निर्णय व योजनांची १८७ हून अधिक आश्वासने देण्याचा धडाका लावून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये दरवर्षी आठ टक्के वाढ होत असून त्यास पाच वर्षे स्थगिती देण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धर्तीवर महापौरांसाठीही निधी तयार करून त्यातून पाच ते ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येईल. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दूरध्वनी केल्यावर घरी रुग्णवाहिका व डॉक्टर तपासणीसाठी उपलब्ध होतील.
उपनगरात कर्करोग रुग्णालय आणि हृदयरोग रुग्णालय
उपनगरात टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेचे अद्ययावत कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार असून तेथे केमोथेरपी आणि रेडिएशनचा सुविधा मोफत उपलब्ध होतील. त्याचबरोबर हृदयविकाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार असून तेथे एनजीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नायर रुग्णालयाच्या आवारात दहा मजली सुपरस्पेशालिटी कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल. केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांना संलग्न परिघीय रुग्णालये उभारण्यात येतील.
मुंबईतील वैद्यकीय शिक्षण क्षमता दुप्पट करणार
मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता दुप्पट करण्यात येणार असून तेथे पदवी आणि पदव्युत्तरच्या जागा वाढविण्यात येतील.
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाच विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत मुंबई महापालिका रुग्णालयांशी संलग्न बाळासाहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्यात येईल. मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योजक धोरण राबविण्यात येईल. मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून मराठी ग्रंथालय व सांस्कृतिक केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. मराठी तरुणांसाठी ‘ मुंबई फेलोशिप ‘ योजना सुरू करण्यात येईल. परवडणाऱ्या घरांचे धोरण तयार करून मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखण्यात येईल.
पूरमुक्त मुंबई
जपानी तंत्रज्ञान, आयआयटी आणि व्हिजेटीआय यांच्या मदतीने येत्या पाच वर्षात मुंबईला पूर्णपणे पूरमुक्त करण्यात येणार आहे. पर्जन्य जलवाहिनीचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. ब्रिमस्टोवँड-२ ची अपूर्ण कामे लवकर पूर्ण केली जातील. सतत पूर येणाऱ्या भागात पंपिंग स्टेशन्स उभारून जलद गतीने पाण्याचा उपसा करण्यात येईल. त्याचबरोबर पूरस्थितीचा अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी आयआयटीच्या तज्ञांचा संशोधन गट स्थापन करण्यात येईल.
बेस्ट प्रवासासाठी महिलांना ५० टक्के सवलत
बेस्टच्या बस गाड्यांमध्ये पण महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. बेस्टच्या ताफ्यातील सर्व गाड्या २०२९ पर्यंत पूर्णपणे विद्युतआधारित करण्यात येणार असून त्यांची संख्या दहा हजार पर्यंत वाढविण्यात येईल. मेट्रो आणि रेल्वे स्थानकावरून घरापर्यंत पोचविण्यासाठी मिडी आणि मिनी बस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात येईल.
प्रत्येक प्रभागांमध्ये वातानुकूलित अभ्यासिका
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये वातानुकूलित आणि वायफाय सुसज्ज अभ्यासिका २४ तास उपलब्ध करण्यात येतील. होतकरू कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मोफत ओपन थिएटर आणि कमी दरात रेकॉर्डिंग स्टुडिओ उपलब्ध करून देण्यात येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई रत्न शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येईल.
महापालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभाग
मराठी भाषा संवर्धन व प्रचारासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात येणार असून प्रत्येक विभागात मराठी नाटक लोककला आणि साहित्यासाठी सुसज्ज मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करण्यात येणार आहे. फक्त मराठी चित्रपटांसाठी खास मराठी मल्टिप्लेक्स उभारण्यात येतील. मराठी कलाकार व संस्थांना महापालिकेकडून पाठबळ देण्यात येईल.
महापालिका प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
महापालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि नागरिकांना सर्व सुविधा त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात येईल. महापालिकेची सर्व खरेदी जेम पोर्टल द्वारे करण्यात येईल इमारतींचा आराखडा मंजूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आराखडा तयार करण्यात येईल.
- लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि लघुउद्योग स्थापन करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- महिलांसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर शौचालयांची उभारणी, महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज आणि उत्पादन विकण्यासाठी हक्काचे वेडिंग झोन, त्याचबरोबर मुंबई डिजिटल सखी अंतर्गत महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता कोडिंग आणि ऑनलाइन चे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी प्रयोगशाळा उभारणार
- वांद्रे कुर्ला संकुलात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची उभारणी करण्यात येणार असून तेथे दोन लाख नोकऱ्या उपलब्ध होतील
- मुंबईला फिनटेक सिटी बनविणार
- मुंबईतील सर्व भाजी मंडयांचे नूतनीकरण व पुनर्विकास करण्यात येणार असून मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करण्यात येईल
- गोराई येथे समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प, दहिसर, पोईसर, मिठी नदीचा कायापालट, मुंबई टँकर माफिया मुक्त करणार
- पावसाचे पाणी साठवणाऱ्यांना मालमत्ता कर व पाणीपट्टीत सवलत
- भुयारी व जमिनीवर पार्किंग क्षमता वाढवून कम्युनिटी पार्किंग सुविधा
- सर्व मोकळ्या जागांची देखभाल खासगी सहभागातून न करता केवळ महापालिकेकडून, स्थानिक नागरी संघटनांना पहारेकऱ्याची भूमिका
- सर्व फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून विक्रेता ओळखपत्रे देणार, पात्र फेरीवाल्यांचे फेरीवाला क्षेत्रात पुनर्वसन, अन्य ठिकाणे ना फेरीवाला क्षेत्र घोषित करणार
- हुतात्मा चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय
- रवींद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुनर्विकास आणि गरजेनुसार तीन नवीन नाट्यगृहांची उभारणी
